नागपूरचा बडकस चौक आणि सद्गुरु श्रीगजानन महाराज

नागपूरचा बडकस चौक आणि सद्गुरु श्रीगजानन महाराज

शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराज हे भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करणारे करुणासागर विभूतीमत्व होते. त्यांच्या कृपेचा, महिम्याचा आणि भक्तवत्सलतेचा अनुभव भाविकांनी वेळोवेळी घेतला आहे. १९०८ मधे अशाच एका अद्भुत आणि ऐतिहासिक घटनेचे नागपूर शहर साक्षीदार झाले. सन १९०८ मध्ये श्री गजानन महाराज नागपूर येथे सुमारे सहा महिन्यांच्या मुक्कामासाठी आले होते. या काळात ते सीताबर्डी येथील श्रीमंत गोपाळराव बुटी यांच्या वाड्यात वास्तव्यास होते. या मुक्कामादरम्यान त्यांनी नागपूरकर भक्तांना आपल्या अमृतमय उपदेशाने जीवनमार्ग दाखवला. महाराजांचे दर्शन, चरणस्पर्श आणि वचन यामुळे अनेकांच्या जीवनात श्रद्धा आणि आशेचा नवा किरण आला.नागपूरचा हा मुक्काम संपण्यापूर्वी, श्रीमंत रघुजी महाराज भोसले ( चतुर्थ ) आणि धर्मभूषण श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले यांनी श्री गजानन महाराजांना महालच्या भोसले राजवाड्यात तसेच सक्करदरा राजवाड्यात आमंत्रित केले. तेथे महाराजांची पाद्यपूजा करून यथोचित सन्मान करण्यात आला.

“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥”

याच नागपूर मुक्कामात शहरातील एक प्रसंग पुढे जाऊन अत्यंत चमत्कारिक ठरला. सीताबर्डीवरून गजानन बाबांची स्वारी भालदारपुर्‍यात डॉ लक्ष्मणराव परांजपे (पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या अनुपस्थित कार्यवाहक सरसंघचालक राहीलेले ) यांच्या वाड्यात आली. येथे परांजपे कुटूंबियांनी श्रीमहाराजांची मनोभावे पूजा केली. पुढे सध्याच्या रुईकर रस्त्यावरून जातांना मध्ये एक चौक लागला. आज हा चौक बडकस चौक किंवा पंडित बच्छराज व्यास चौक म्हणून ओळखला जातो. मात्र त्या काळी या चौकाला नागपूरी लोकभाषेत “निपुत्रिक चौक” असे संबोधले जात असे.

या चौकाच्या चारही बाजूंना असलेल्या घरांमध्ये अनेक वर्षांपासून वंशवृद्धी झाली नव्हती. त्यामुळे हा चौक “निपुत्रिक” म्हणून ओळखला जाऊ लागला होता. अशा परिस्थितीत अवधूत, दिगंबर आणि अवलिया स्वरूपातील श्री गजानन महाराज चालता-चालता अचानक थांबले आणि बडकस वाड्याच्या ओट्यावर बसले. आजच्या संदर्भ द्यायचा झाल्यास, सध्याचे महाराष्ट्र एम्पोरियम असलेली जागा होय. महाराजांचे दर्शन होताच बडकस कुटुंबीय भावविवश झाले. त्यांनी श्रद्धेने महाराजांची पाद्यपूजा केली.

अनंत कोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज असलेल्या श्री गजानन महाराजांनी ती पूजा स्वीकारून बडकस दांपत्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला.

“श्रद्धावान् लभते ज्ञानं, तत्परः संयतेन्द्रियः ।

ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥”

या घटनेचा परिणाम पाहता पाहता संपूर्ण चौकात पसरला. बडकस कुटुंबाच्या पाद्यपूजनाची वार्ता कळताच या चौकातील इतरही चार घराण्यांतील लोक महाराजांच्या दर्शनासाठी पुढे आले. कालांतराने, त्या सर्व घराण्यांमध्येही वंशाभिवृद्धी झाली आणि श्रीमहाराजांचे शब्द अक्षरशः खरे ठरले.

हा प्रसंग केवळ चमत्कार नव्हता, तर सद्गुरुकृपेचा साक्षात अनुभव होता. याच दिव्य घटनेमुळे “निपुत्रिक चौक” म्हणून ओळखला जाणारा हा चौक पुढे “बडकस चौक” म्हणून ओळखला जाऊ लागला. नागपूरच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासात हा प्रसंग आजही श्रद्धेने स्मरणात ठेवला जातो.

आज माघ वद्य सप्तमी, शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराजांचा १४८ वां प्रगट दिन.

या पावन दिनी करुणामूर्ती, भक्तवत्सल, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांना कोटी कोटी अभिवादन

Share blog on whatsapp

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *