हडस माझी नागपूरची शाळा

हडस माझी नागपूरची शाळा

"हडस" माझी शाळा मला फार प्रिय. घरा पासून शाळेत जाण्याचा रस्ता लांबलचक, नागमोडी वळणाचा.रस्त्यावर कुठेही खाच खळगे नव्हते.किंवा असे म्हणायला हरकत नाही की सायकल हातात धरून मैत्रिणीं बरोबर गुजगोष्टी करत जातांना ते आम्हाला जाणवले नसावेत.दुतर्फा ऐसपैस वाढलेले विशाल वृक्ष.एखादा गुलमोहर, एखादे उंचनिच सुगंधित बुचाचे झाड,एखादा वयोवृद्ध "वड"आपल्या विशाल शाखा पसरून पारंब्यां चा पिसारा मजेत डोलवतांना दिसे.तापमान जसे वाढत जाई तशी गुलमोहराची नक्षी झाडा वरून खाली जमीनीवर उतरे आणि आशा आकांक्षांना नवीन रंग मिळत.तळपत्या सूर्य देवाशी लपंडाव खेळत एखादा पांथस्थ वडाची सावली अंगावर पांघरून निवांत पडून राही. 6/7 वीत शिकणाऱ्या आम्हा मुलींची मनेही साधी सरळसोट असायची.हातात सायकल धरून मैत्रिणीं बरोबर हितगुज करत चालतांना रस्ता कधी संपे याचा पत्ताच लागत नसे. पांढराशुभ्र ब्लाऊज, गुढघ्या खाली पोहचणारा निळा स्कर्ट.लाल रिबन्स नी वेण्या आवळलेल्या. (आमच्या घरात कपाळावर कुंकु अनिवार्य असे.)कपडे अंगा बरोबर असण्या ऐवजी थोडे ढगळ असावेत यावर वडील मंडळीचे एकमत असे.एकूण काय गणवेश काय असावा ते शाळेने ठरवलेले आणि तो कसा असावा हे गृहखाते ठरवत असे.मग आम्ही त्यात काही तरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करीत असू."खास" दिवशी लाल रिबन्स पण खास असत. तिला पेटत्या उदबत्तीचे चटके देऊन महिरप केली जाई.किंवा एखादी रिबन मोत्यांच्या लडीने आकर्षक केली जाई.हातात बांगडी आवश्यक असे पण दुसर्या हातात घड्याळ घालायची मुभा पण दिली जाई.साधारणपणे बहुतेक मुली कानात रिंग,मोत्यांचे चौकडे घालत. एकूण काय गणवेश आणि वेश विशेष वाखाणण्या सारखा नव्हता हे नक्की. एक मात्र होते माझ्या शाळेचा गणवेश मी इस्त्री न करता कधीच वापरला नाही. माझ्या शाळेचे आवार भले मोठे होते.एका कोपर्यात वाॅचमन दादांचे घर,मधे खेळण्या साठी ऐसपैस ground. शाळेचा दुसरा कोपरा माझ्या फार आवडीचा होता.तिथे होता आमच्या शाळेचा पोहण्याचा तलाव.मला वाटत 50/52 वर्षा पूर्वी शाळेत असा तलाव 
असणे ही आमच्या साठी विशेष बाब होती.
आजकाल महागड्या शाळा आहेत. तिथे विद्यार्थ्यांची झुंबड आहे.पण मोकळा श्वास घेण्यासाठी,खेळण्यासाठी गरजेची असणारी मैदाने हरवली आहेत.
आज मनाशी विचार करते तेव्हा असे लक्षात येते की "दिल है छोटासा,छोटीसी आशा "असे छोटेसे जग होते आमचे.मला वाटत 6वी च्या उन्हाळ्यात पोहायला शिकायचे अशी टूम निघाली.त्या आधी भाड्याच्या सायकली वर सायकल शिकणे झाले होते.बहुतेक 25 पैशात तास दोन तास सायकल पळवायला मिळत असे.आता बाबांना लाडीगोडी लावणे सुरू होते.सायकल हवी...नवी सायकल हवी बाबा बँकेतून घरी येण्याच्या वेळी पाण्याचे भांडे आणि हात पाय पुसायला रुमाल घेऊन मी दाराशी थांबत असे. माझा हा खटाटोप आई बाबा दोघांच्या ही लक्षात आला.आणि एक दिवस काळी सोनेरी सायकल दिमाखात दारात उभी राहिली.
एक स्वप्न पूर्ण झाले आता नव्याचा शोध सुरू झाला. हातात पैसे घेऊन मैत्रिणींसह तलावावर पोहचले. ना सोडायला बाबा आले ना न्यायला आई आली.भुरे लांबसडक केस रुमालाने डोक्यावर बांधले आणि पोहणे शिकवणाऱ्या ताई समोर उभी राहिले माझ्या बरोबर माझ्या 3/4 सख्या उभ्या होत्या.ताई ने हातातले बादलीभरून पाणी आमच्यावर ओतले.आम्ही कुडकुडत उभ्या राहिलो एक एक करत आम्ही पाण्यात ढकलले जात होतो. गटांगळ्या खात ,हात पाय मारत होतो, नाका तोंडात पाणी आणि ताईची बडबड यात4/5 दिवस पार पडले आता हळूहळू तलावाची दोन्ही टोके मजेत पार करत, पाण्यात डुंबत रहायला मजा येत होती. आज मी आठवायचा प्रयत्न करतेय की कुठल्या रंगाचे पोहण्याचे पोशाख घालून मी तलावात उतरत होते.मला जाम आठवत नाही. (आज कुठेही परदेशी, देशी जातांना कमीत कमी 2/4 पोहण्याचे पोशाख बरोबर असतातच! "कालाय तस्मै नमः")7 फुटावर पाण्यात उडी मारणे शिकले आणि फक्त त्या दिवशी आई बाबा लेकीचे पाण्यातले खेळ बघायला आले होते.
आमच्या शाळेत पिण्याच्या पाण्याचे नळ असत. एका रांगेत 12/15 नळ असत.घरून उकळलेले पाणी बाटलीत भरून शाळेत जाण्याचे ते दिवस नव्हते. पण कधीही ते पाणी आम्हाला बाधले नाही.डबा खाण्याची सुट्टी तर मोठी मौजेचे असायची. बहुतेक सर्व डबे पोळी भाजीचे असायचे.तोंडी लावायला लोणच्याची फोड,किंवा एखादा पापडाचे तुकडा.सर्व सख्या गोल करून बसत कुणाच्या डब्यात नावडती भाजी असेल तर तिला आपल्या डब्यातली आवडती भाजी देण्यासाठी सगळ्याच तत्पर असत.
पटापट डबा संपवून नळा वरती हात स्वच्छ करून गाणी,कविता म्हणण्याचा सोहळा सुरू होई.आमच्या वर्गात तशा बर्याच जणी गाणार्या होत्या पण मला आवर्जून आठवते ती "नीला मुजूमदार." सावळ्या रंगाची,थोडीशी स्थूल, ठेंगणी ठुसकी, चष्माच्या आतून जगाकडे पाहणारी, गोड गळयाची नीला.ती गायला नेहमीच तयार असे. तिचे गाणे ऐकले की मग तो दिवसच गाणारा होऊन जाई.तिची आणि माझी मैत्री शाळे नंतर महाविद्यालयात पण दृढ होत गेली.
लग्नानंतर मी पुण्यात आले .माहेरी गेल्यावर कधी मधी भेट होई.आणि एकदा कळले "नीला गेली". तेव्हापासून कधी ही आकाशात काळे ढग सैरावैरा धावू लागले,रिमझिम पाऊस सुरू झाला आणि अचानक वीज चमकली की मला वाटतं आता एक सुंदर तान घेऊन नीला गाणं ऐकवेल .पावसाची गाणी तिला विशेष प्रिय होती.
बघता बघता दिवस भिंगरी सारखे गिरक्या घेत पुढे सरकत होते .आता यंदा 10 ची परिक्षा देऊन पुढे जायचे होते. आमचे हे शाळेतले शेवटचे स्नेह संमेलन होते.छान छान साड्या नेसून तयार होऊन शाळेत आलो.काही वेळातच असे लक्षात आले की आता बोलतांना शब्द कमी आणि घशात आवंढेच जास्त अडकताहेत .शाळेतून बाहेर पडतांना परत एकदा वर्गात जाऊन बेंचवर बसून हितगुज केले .असे जाणवले की आता खुर्ची टेबल सुध्दा हुंदके देतयं.
शाळेतल्या बाई(तेव्हा बाईंना टीचर म्हणायची पण पद्धत नव्हती)हातात हात घेऊन समजावत होत्या आता तुम्ही मोठ्या होणार,जबाबदारीने वागा, एक सुजाण नागरिक बना.हे सर्व सांगणाऱ्या होत्या "सुहासिनी लाडकर".त्यांनी आम्हाला N C C त दाखल केले.12/13 वर्षांच्या मुली पोक काढून,खाली मान घालून चालतांना बघितले की त्या पाठीवर थाप मारून सांगत..मान ताठ आणि नजर सरळ समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात भिडणारी ठेवा.निम्मी लढाई तुम्ही तिथेच जिंकाल.
शिकवणारे सर्वच शिक्षक उत्तम होते.आजही काही नावं आठवतात , काही आठवत नाहीत. पण एक गोष्ट खरी आहे ती सर्व चांगली माणसं होती.
2/3वर्षा पूर्वी शाळेत मोठा समारंभ झाला. शाळेची Platinum Jubilee साजरी झाली.माननीय श्री.नितिन जी गडकरी,आणि माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.खूप देखणा समारंभ झाला.
परत एकदा शाळेचे ,वर्गाचे दर्शन घेतले.आता पूला खालून बरेच पाणी गेले होते.कातडी जशी निब्बर झाली होती तसे मन ही.आता घशात अडकणारे आवंढे गिळण्याचे नाटक एका कसबी कलाकारा सारखे जमू लागले होते.
शाळेने मला चांगला विचार करायला शिकवले.हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या का होईना जिवापाड प्रेम करणाऱ्या मैत्रिणी दिल्या.वाईट गोष्टींचा निषेध करायला शिकवले.थोडक्यात सुखी माणसाचा अंगरखा आज माझ्या जवळ आहे तो मला माझ्या शाळेतून मिळाला आहे.
 

Share blog on whatsapp

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *