छोट्या धंतोलीतून शाळेत जाताना आईची शाळा पडायची. शाळेच्या समोरच होता भाजी बाजार व सीताबर्डीतील प्रसिद्ध फुलांचा बाजार. बाजूलाच भरायचा सोमवार व गुरुवार भाजी बाजार.
छोट्या धंतोलितून जवळच हे बाजार होते. नागनदी(नाला) वरील छोटा पुल ओलांडला तर हंपयार्ड रोड लागायचा. हा रस्ता अगदी तोंडपाठ होता कारण आमची शाळा न्यू इंग्लिश हाईस्कूल,बर्डी ब्रांच.
हम्प्यार्ड रोड च्या उजव्या हातावर होती कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल व समोर होती जोशीवाडी. माझा मित्र विश्वास बक्षी येथेच राहायचा.
कुर्वे शाळेच्या बाजूलाच होते नारमल स्कूल क्वार्टरस. पण यांना नॉर्मल स्कूल क्वार्टरस म्हणायचे. सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत होती.दोन प्रकारची वसाहत होती त्यातील एक बंगलेवजा होती व मध्ये ग्राउंड होते.
नॉर्मल हे प्रचलित नाव होते. या क्वार्टर समोर होते नागजी भाई टाऊन. श्री.शेंडे यांचा एक लाल रंगाचा नजरेत भरणारा बंगला होता. याच बंगल्याच्या बाजूने गेल्यास शेंडे यांच्या गल्लीत खटी वकील, केणेकर, व त्यांच्या समोर अधिकारी बंधू व भगिनी राहायचे, या बंधू - भगिनींची '' मणिमेळा '' नावाची खास किशोरवयीन मुला - मुलींची संस्था होती, त्यात वाचनालय, खेळ इत्यादिंची खुप छान सोय होती. पुढे कॉर्पोरेशन ची शाळा व पुढे मोठे ग्राउंड होते. या ठिकाणी भाजी बाजार भरायचा. भाजी बाजाराची उजव्या हातावर आहे प्रसिध्द भिडे कन्या शाळा.
या शाळेला विसरुच शकत नाही.माझी आई व मावश्या याच शाळेत शिकल्या. आईच्या तोंडून मावश्या आल्यावर शाळेतल्या गमती जमती,मैत्रिणी व शाळा यावर एक शाळाच भरायची. आम्ही मन लावून ऐकत असायचो.त्यांचे खदखदून हसणे व कधीकधी खट्याळ हसणे आजही आठवते. घरून शाळेत जाणे व मैत्रीणीना हाक मारत कसे जायचो हे फक्त आईच्याच तोंडून ऐकण्यात जी मजा होती याचे वर्णन करूच शकत नाही. आईच घर म्हणजे टेकडी लाईन वरील देवांचा वाडा. आपली आई ( कमल खोलकुटे) ताई मावशी(अमीन),शकुन मावशी (देवईकर)व गुलु मावशी(कुळकर्णी) एकत्र शाळेत जाताना कश्या मजा करत जायच्या हे आई नेहमीच सांगायची. घरून सरळ आनंद टॉकीज वरून न जाता वाड्याच्या बाजूच्या गल्लीतून बुटी वाड्याजवळ मैत्रीण गोळा करत जायची व मग हनुमान गल्ली मधून शाळेत जायची. आईच्या बऱ्याच मैत्रीण पातुरकर राम मंदिर परिसरात होत्या.गुलु मावशी नंतर भिडे कन्या शाळेत शिक्षिका होती. गुलाब कुलकर्णी या नावाने किंवा गुलाब देव म्हणून.
भिडे कन्या शाळेजवळ होते धनवटे चेंबर. भिडे कन्या शाळे जवळील गल्लीत होते डॉ.पेंढारकर यांच होमिओपॅथी दवाखाना. शाळे जवळ रेल्वे तिकीट मिळायची. धनवटे चेंबर मध्ये होते नरेशचंद्र यांचे मोठे सायकल चे दुकान होते. रस्त्याच्या पलीकडे होती हनुमान गल्ली.हनुमान गल्लीत बर्डी मेन रोडवरून आत शिरल्यावर दोन /तीन छोटी सायकलची दुकानें, यांच्याकडे एक आणा /दोन आणे या दराने सायकली भाड्याने मिळायच्या, नंतर खरे टेलर्स हे त्याकाळचे मोठे टेलरिंग शॉप होते, ते सूट स्पेशालिस्ट होते, त्यानंतर थोडं पुढे झेंडा चौक होता, तिथे छोटी / मोठी सोनारांची, इलेक्ट्रिक व दुचाकी दुरुस्तीची दुकानें, सचिन साहित्य केंद्र हे प्रसिद्ध पुस्तकांचे दुकान, नंतर थोडं पुढे गेल्यावर महाराष्ट्र लॉज येथे त्या काळात जी नाटके यायची त्यातले कलावंत मुक्कामाला असायचे. मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंप होता व लागून पोस्ट ऑफिस होते. पेट्रोल पंप पातूरकर यांच्या घराजवळ मोदी नंबर ३च्या तोंडाशी होता. पेट्रोल पंपा समोर दुकाने होती.यात एका लहान गल्लीतून गेल्यास जे.प्रभाकर पेंटर यांचे दुकान होते.सर्व सिनेमाची पोस्टर, नट व नटी यांची हुबेहूब चित्र काढण्यात त्यांचा हातखंडा होता. बाजुला होते लिलाव वाले जिंतूरकर.नेताजी मार्केट मध्ये हार्डवेअर ची दुकानें पण होती, त्यातले प्रसिद्ध म्हणजे वर्तक आणि कोल्हटकर यांचे हार्डवेअर चे दुकान होते जे.प्रभाकर यांचे पेंटिंग पाहण्यासाठी शाळेतील मधल्या सुट्टीत व घरी जाताना येथे थांबा असायचा. मुख्य रस्त्यावर कोपऱ्यात नेताजी मार्केट मध्ये मेन रोड वर नोवेल्टी स्टेशनरी स्टोअर होते व आजही आहे. एका दुकानावर हवाबाण हरडे असा बोर्ड होता. व बाजूलाच होते नागपुरातील सुप्रसिध्द गुलाबांचा बाजार नेताजी मार्केट. १९९४ किंवा९५ साली हा बाजार उघडला. ठोक व सर्व प्रकारचे फुले येथे मिळायची. नेताजी मार्केटच्या तोंडावर होते नंदनवन मुक बधीर विद्यालय व बाजूला श्री टॉकीज. समोर होती मोदी नंबर एक व दोन. श्री टॉकीज समोर चविष्ट कचोरी मिळायची.
नेताजी मार्केट च्या बाजूला व भिडे कन्या शाळे समोर सोमवार व बुधवार भाजी बाजार होता. भिडे कन्या शाळेसमोर बाजारात एक लोहार होता. फुल मार्केट च्या कोपऱ्यात एक चाळ होती.बॉम्बे बांगडी स्टोअर चे मालक जगदंबे यांचे घर होते.
आज हा परिसर ओळखू येत नाही.लहानपणी आपण नक्कीच हा परिसर बघितला असेलच.
आईच्या मैत्रिनींची काही नावे आठवतात.
पद्मामावशी चक्रदेव शंकर नगर,शांता मावशी गर्गे, शांतामावशी मानकेकर,मनी मावशी मनोहर नंतर ओक ठाणे,किर्पेकर,बेंद्रे/बोंद्रे बुलढाणा,इंदूमावशी देशमुख,महाल,बक्षी गोपालनगर, कोळसकर धंतोली व निर्मला मावशी अभ्यंकर दीक्षित वाड्यात आमच्या समोर रहात होती.